---Advertisement---
जर तुम्ही आयफोन वापरत असाल आणि सॉफ्टवेअर अपडेटच्या सूचना वारंवार पुढे ढकलत असाल, तर आता सावध होण्याची गरज आहे. लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सऍपने आयफोन वापरकर्त्यांसाठी नवीन नियम जाहीर केला असून, 30 नोव्हेंबर 2026 पासून अॅप वापरण्यासाठी किमान iOS 15.5 किंवा त्यावरील आवृत्ती असणे आवश्यक असणार आहे.
सध्या व्हॉट्सऍप iOS 15.1 आणि त्यावरील आवृत्त्यांवर कार्यरत आहे. मात्र, सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आणि नवीन फीचर्सचा लाभ देण्यासाठी कंपनी जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमचा सपोर्ट बंद करत आहे. त्यामुळे आवश्यक अपडेट नसलेल्या डिव्हाइसमध्ये व्हॉट्सऍप वापरण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
या बदलाचा परिणाम प्रामुख्याने iPhone 6s, iPhone 6s Plus, iPhone SE (पहिली पिढी), iPhone 7 आणि iPhone 7 Plus वापरकर्त्यांवर होऊ शकतो. मात्र, या सर्व मॉडेल्ससाठी ऍपलने iOS 15.8.8 अपडेट उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे फोन अपडेट केल्यास व्हॉट्सऍप वापरणे सुरू राहणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे व्हॉट्सऍप कोणताही आयफोन पूर्णपणे बंद करत नाही. तुमचा फोन नेहमीप्रमाणे सुरू राहील. मात्र, व्हॉट्सऍप च्या नवीन अटी पूर्ण न झाल्यास अॅपचे अपडेट्स आणि काही सेवा बंद होऊ शकतात.
तुमच्या आयफोनमध्ये कोणती iOS आवृत्ती आहे हे तपासण्यासाठी सेटिंग्समध्ये जाऊन जनरल आणि त्यानंतर सॉफ्टवेअर अपडेट हा पर्याय निवडा. जर नवीन अपडेट उपलब्ध असेल तर ते त्वरित इन्स्टॉल करा. वेळेत सॉफ्टवेअर अपडेट केल्यास व्हॉट्सऍप सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहील.
व्हॉट्सऍपच्या या निर्णयामुळे जुन्या आयफोन वापरकर्त्यांसाठी सॉफ्टवेअर अपडेट करणे आता अत्यावश्यक बनले आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी आपल्या फोनमधील सॉफ्टवेअर अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.









