अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात एसटी विभागाची धडक मोहीम; बसस्थानक परिसरात 200 मीटर ‘नो पार्किंग झोन’ची कडक अंमलबजावणी…!

---Advertisement---

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी आणि एसटीच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत राज्यभरातील बसस्थानक परिसरात 200 मीटर अंतरापर्यंत ‘नो पार्किंग झोन’ची कठोर अंमलबजावणी करण्यात येत असून 5 जून ते 15 जून या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटी महामंडळाच्या महसुलावर विपरीत परिणाम होत असल्याचे अनेक आढावा बैठकीत निदर्शनास आले होते. यानंतर राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व विभागांना विशेष तपासणी मोहिमेचे निर्देश देण्यात आले आहेत. बसस्थानक परिसरातील 200 मीटर हद्दीत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष ठेवून स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जात आहे.

धुळे विभागात सुरक्षा व दक्षता अधिकारी दीपक धात्रक यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकुवा आणि तळोदा बसस्थानक परिसरात 11 जून रोजी विशेष कारवाई करण्यात आली. या मोहिमेत स्थानिक वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या सहकार्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी सहाय्यक सुरक्षा निरीक्षक जयवंत कोळी, संजय पवार, अक्कलकुवा आगाराचे वाहतूक निरीक्षक भावेश गोस्वामी, वाहतूक नियंत्रक संदीप जावरे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

धुळे विभागातील धुळे मध्यवर्ती बसस्थानक, देवपूर, साक्री, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, शहादा, दोंडाईचा, शिरपूर आणि शिंदखेडा येथील बसस्थानक परिसरातही ‘नो पार्किंग झोन’ अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि नियमित सेवा उपलब्ध करून देत त्यांचा एसटीकडे पुन्हा ओढा वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---