---Advertisement---
राज्यात खुनाच्या घटना काही केल्या कमी होत नसून वाढतच चालल्या आहे. अशातच पुन्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेने राज्यासह बीड जिल्हा हादरला आहे.
हि घटना बीड जिल्ह्यातील लिंबागणेश परिसरात घडली आहे. या खून प्रकरणात पोलिस तपासातून मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पती किरण सोनवणे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पत्नी, तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राविरोधातील तपासात अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. डिजिटल पुरावे आणि आरोपींच्या चौकशीतून संपूर्ण कट उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
31 मे रोजी बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंबागणेश परिसरात रस्त्यालगत दुचाकीजवळ किरण सोनवणे यांचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र शवविच्छेदन अहवालात मृत्यू अपघाती नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.
पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान किरण सोनवणे यांची पत्नी प्रियांका सोनवणे, तिचा प्रियकर दशरथ परदेशी आणि त्याचा मित्र धीरज येडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशीत समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी पत्नी प्रियांका हिने तिचा पती किरण याला चिकन राईस आणण्यासाठी बाहेर पाठवले होते. त्याचवेळी तिने प्रियकर दशरथ परदेशी याला फोन करून पतीबाबत माहिती दिली. यानंतर दशरथ परदेशी आणि त्याचा मित्र धीरज येडे यांनी किरण सोनवणे यांना अडवून त्यांचा गळा आवळल्याचा आरोप करण्यात येत आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाजवळ दुचाकी ठेवून अपघाताचा बनाव रचण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, घटना घडल्यानंतर दशरथ परदेशी याने प्रियांकाला फोन करून “कार्यक्रम ओके” असा संदेश दिला होता. तसेच त्यानंतर दोघांमध्ये सोशल मीडियावरील कॉलद्वारे अनेक तास संवाद झाल्याचे डिजिटल पुराव्यांतून उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मोबाईल कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया संवाद आणि इतर तांत्रिक पुरावे जप्त केले आहेत. न्यायालयात हजर केल्यानंतर तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.









