---Advertisement---
भारतीय वायुसेनेच्या AN-32 मालवाहू विमानाचा आसाममधील जोरहाट विमानतळावर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमान जोरहाट एअर फोर्स स्टेशनवर उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर विमानाला आग लागल्याची माहिती मिळत असून या घटनेमुळे विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली.
दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव आणि अग्निशमन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. विमानातील जवान आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले. प्राथमिक वृत्तानुसार, या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली असून काही जवान किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
AN-32 हे भारतीय वायुसेनेचे महत्त्वाचे मालवाहू विमान मानले जाते. दुर्गम आणि संवेदनशील भागांमध्ये सैन्य साहित्य, रसद आणि जवानांची वाहतूक करण्यासाठी या विमानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे या घटनेकडे संरक्षण क्षेत्राचेही लक्ष लागले आहे.
अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडली की अन्य काही कारण होते, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. भारतीय वायुसेनेकडून या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यात येत असून अधिकृत अहवालानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.









