वरणगावात गॅस गोडाऊनवर चोरट्यांचा डल्ला; तब्ब्ल ५८ गॅस सिलिंडरची चोरी….!

---Advertisement---

 

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे मोठ्या प्रमाणावर गॅस सिलिंडर चोरीची घटना उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. वरणगाव ते मुक्ताईनगर महामार्गावरील लाल माती शिवारात असलेल्या भारत गॅस अंतर्गत रोहन गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून तब्बल ५८ भरलेले गॅस सिलिंडर अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. चोरी गेलेल्या सिलिंडरची एकूण किंमत सुमारे ७४ हजार १२४ रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सिलिंडर चोरी होण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना मानली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे गोडाऊन एजन्सीचे संचालक नरेंद्र उत्तमराव अहिरे (रा. भुसावळ) यांच्या मालकीच्या जागेवर असून दुकानासाठी अतिरिक्त साठा येथे ठेवला जात होता. बुधवारी उशिरा रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गोडाऊनचे कुलूप व कडी तोडून आत प्रवेश केला आणि प्रत्येकी सुमारे १,२७८ रुपये किमतीचे ५८ भरलेले सिलिंडर चोरून नेले.

विशेष म्हणजे, गोडाऊनची सुरक्षा व्यवस्था अत्यंत ढिसाळ असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून येथे कोणताही सुरक्षा रक्षक नेमलेला नव्हता. तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही बंद अवस्थेत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने डल्ला मारल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता गोडाऊन किपर शंकर किसन सुरवाडे आणि कर्मचारी अभिलाष बावस्कर हे सिलिंडर घेण्यासाठी आले असता कुलूप तोडलेले आणि सिलिंडर गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ संचालकांना माहिती दिली. त्यानंतर वरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे वरणगाव परिसरात सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सिलिंडर चोरीसाठी वाहनाचा वापर झाला असण्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलिसांकडून परिसरातील हालचालींची चौकशी आणि तपास सुरू आहे. लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---