---Advertisement---
सण जवळ आला की घराघरात आनंदाचं वातावरण तयार होतं. नवीन कपडे, पाहुणचार, घराची सजावट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोडधोड. कोणताही सण असो; होळी, दिवाळी किंवा लग्नसमारंभ तोंड गोड केल्याशिवाय तो पूर्णच होत नाही. त्यामुळे अनेकजण सुरक्षिततेच्या दृष्टीने नामांकित ब्रँडची मिठाई खरेदी करतात. “दोन रुपये जास्त गेले तरी चालतील, पण दर्जा चांगला हवा,” या विश्वासावर ग्राहक मोठ्या कंपन्यांची पाकिटं उचलतात.
मात्र सणाच्या तोंडावर समोर आलेल्या एका कारवाईने हा विश्वास हादरवला आहे. Food Safety and Drug Administration (FSDA) ने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष तपास मोहीम सुरू केली होती. भेसळ रोखण्यासाठी अधिकारी विविध भागांत तपासणी करत असताना त्यांना लखनौतील फैजुल्लागंज परिसरातील एका मोठ्या वेअरहाऊसबाबत माहिती मिळाली.

त्यानंतर अधिकाऱ्यांनी तेथे छापा टाकला. हे वेअरहाऊस प्रसिद्ध ब्रँड Haldiram’s शी संबंधित असल्याचे समोर आले. तपासणीदरम्यान जे दृश्य पाहायला मिळाले ते धक्कादायक होते. गोदामात तब्बल 112 किलो मुदत संपलेली मिठाई साठवून ठेवलेली आढळली. सणासुदीच्या काळात अशी मिठाई बाजारात गेली असती, तर अनेकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकला असता. अधिकाऱ्यांनी तात्काळ तो साठा जप्त करून नष्ट केला.
ही कारवाई फक्त एका ठिकाणापुरती मर्यादित नव्हती. लखनौच्या इतर भागांतही छापे टाकण्यात आले. तपासादरम्यान जवळपास 10,415 किलो मसाले आणि मावा (खोया) संशयास्पद अवस्थेत आढळला. या जप्त केलेल्या साठ्याची अंदाजे किंमत 55.91 लाख रुपये इतकी असल्याचे सांगितले जाते. ऐशबाग परिसरातील एका कोल्ड स्टोरेजमध्ये मोठ्या प्रमाणावर काळी मिरी आणि मावा साठवलेला सापडला, ज्याची गुणवत्ता संशयास्पद होती.
सणासुदीच्या काळात मिठाईची मागणी प्रचंड वाढते. या वाढत्या मागणीचा फायदा घेत काही ठिकाणी जुना किंवा निकृष्ट माल विक्रीस आणला जातो, अशी शंका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पेडा, रसगुल्ला, गुजिया आणि पनीर यांसारख्या पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेनंतर ग्राहकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. नामांकित ब्रँडवर असलेला विश्वास अबाधित ठेवण्यासाठी कंपन्यांनी अधिक कडक गुणवत्ता नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रशासनानेही सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तपास मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
सण साजरा करताना आनंद महत्त्वाचा असला तरी आरोग्य सर्वांत महत्त्वाचे आहे. मिठाई खरेदी करताना उत्पादन तारीख, मुदत संपण्याची तारीख आणि पॅकेजिंगची स्थिती नीट तपासणे आवश्यक आहे. कारण गोड चवीमागे कडू वास्तव दडलेले असू शकते.








