---Advertisement---
Jalgaon Crime : वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत. तुमचे अटक वारंट निघाले आहे, असे पोलीस अधिकारी भासवित एका वयोवृध्दाला धमकावित सायबर ठगांनी १८ लाख २१ हजार ८२७ रुपयांचा गंडा घातला.
मुक्ताईनगर तालुक्यात ७१ वर्षीय वयोवृध्द सेवानिवृत्त झाले असुन ते शेती करतात. १७ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान त्यांच्या व्हाट्सअप मोबाईल क्रमांकावर डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियाकडून बोलत आहे, असे राज मल्होत्रा या सायबर ठगाने सांगत त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर संदीप रॉय या ठगाने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधत पोलीस अधिकारी बोलत असल्याची बतावणी केली. त्यानंतर वयोवृध्द तक्रारदार यांच्या व्हाट्सअप मोबाईलवर संदीप रॉव या ठगाने सिनियर पोलीस अधिकारी असल्याची खोटी बतावणी केली.
संपर्क साधत हा सायबर ठग पोलीस अधिकारी बोलत असल्याचे म्हणाला. तुमच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. आणि हा खोटारडापणा खरा पटावा, यासाठी संशयितांनी तक्रारदार यांच्या व्हॉट्सअपवर गुन्ह्याचे खोटे कागदपत्र व खोटी न्यायालयाची ऑर्डर पाठविली. या गुन्ह्यात तुमचा सहभाग असल्याचे तपासातून समोर आले आहे, आणि अटक वारंट निघाले आहे, असा बनाव केला. वारंवार अटक करण्याची तक्रारदार यांना धमकी दिली.
अटकेची कारवाई टाळण्यासाठी संशयितांनी तक्रारदार यांच्याकडून ऑनलाईन एकुण १८ लाख २१ हजार ८२७ रुपये इतकी आरटीजीएस व एनईएफटीव्दारे त्यांच्या बँक खात्यातून स्वीकारत आर्थिक फसवणूक केली. हा सायबर ठगांनी बनाव केल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी शनिवारी (२८ फेब्रुवारी) तक्रार दिली. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात या तिघे ठगांसह इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापरणारे धारक यांच्या विरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सतीष गोराडे हे तपास करीत आहेत.
विश्वास ठेऊ नका
अनोळखी व्यक्तीने काहीही सांगितले. आणि गुन्हा दाखल केल्याचे काहीही कागदपत्र टाकले तर तत्काळ सायबर पोलीस ठाण्यात जावुन तो प्रकार सांगितला पाहिजे. शक्यतो अनोळखी व्यक्तीचा फोन उचलू नये. आणि असे कोणी धमकाविल्यास त्याबद्दल पोलिसांना माहिती दिली पाहिजे. अशी कृती केल्याने संभाव्य फसवणूक टाळता येऊ शकते. संशयितांचा नागरिकांच्या पैशांवर डोळा असतो. त्यामुळे अतिशय सतर्क राहणे आवश्यक आहे.









