---Advertisement---
विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांना खोचक सल्ला दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना नरेश म्हस्के म्हणाले की, दिल्लीकडे धाव घेण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी एकदा एकनाथ शिंदे यांना फोन करावा. एकनाथ शिंदे हे मोठ्या मनाचे नेते आहेत. त्यांनी फोन केला तर शिंदे त्यांच्या मागे उभे राहतील, असा टोला त्यांनी लगावला.
सध्या विधान परिषद सदस्यत्वाचा उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत आहे. त्यामुळे ते पुन्हा आमदार होतील का, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. ठाकरे गटाकडून मात्र उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली जात आहे.
यावेळी नरेश म्हस्के यांनी राज्यसभा निवडणुकीचाही उल्लेख केला. राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार फुटतील अशी भीती असल्यामुळेच त्यांनी उमेदवार दिला नाही, असा दावा त्यांनी केला.
तसेच त्यांनी ‘ऑपरेशन टायगर’वरही भाष्य केले. सध्या अधिवेशन सुरू असल्यामुळे एकनाथ शिंदे व्यस्त आहेत, त्यामुळे ऑपरेशन टायगर सध्या थंड आहे. मात्र पुढे काय होईल ते पाहा, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, मे २०२६ मध्ये विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होणार आहेत. सध्याच्या विधानसभा संख्याबळानुसार महाविकास आघाडीला त्यापैकी केवळ एकच जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ही जागा उद्धव ठाकरे यांनाच मिळावी, यासाठी ठाकरे गट आग्रही आहे.
आता एकनाथ शिंदे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष या जागेबाबत काय भूमिका घेतात, तसेच मतविभाजन टाळण्यासाठी कोणती तडजोड होते, यावरच उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.









