---Advertisement---
बुलढाणा येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. सुरुवातीला साधा रस्ता अपघात वाटणाऱ्या प्रकरणामागे प्रत्यक्षात थरारक कट असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे या घटनेत मृत्यू झालेल्या शिक्षिकेच्या हत्येचा कट तिच्याच पतीने रचल्याचा आरोप असून पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे.
मृत महिला वृषाली प्रकाश गावंडे या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्या पिंपळगाव काळे येथील शाळेत नोकरी करत होत्या आणि रोजप्रमाणे आपल्या स्कुटीवरून शाळेत जात असत. 2 मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्या घरातून शाळेसाठी निघाल्या. पातुर्डा ते कवठळ या रस्त्यावर त्या जात असताना अचानक एका पिकअप वाहनाने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात वृषाली गावंडे यांचा जागीच मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर काही वेळातच स्थानिक नागरिक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी मृतदेहाशेजारी वृषाली गावंडे यांचे पती प्रकाश गावंडे बसून रडत असल्याचे दिसले. त्यामुळे सुरुवातीला हा साधा अपघात असल्याचेच सर्वांना वाटले. मात्र वृषाली यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी या घटनेबाबत संशय व्यक्त केला. त्यांना हा अपघात नसून घातपात असू शकतो, अशी शंका होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक गंभीरपणे सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल कॉल रेकॉर्डची तपासणी केली. या तपासातून काही संशयास्पद बाबी समोर आल्या. पोलिसांनी या धाग्यांवरून पिकअप वाहनाचा चालक मंगेश सूर्यवंशी याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने दिलेल्या कबुलीजबाबामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले.
मंगेश सूर्यवंशी याने पोलिसांना सांगितले की वृषाली गावंडे यांच्या पती प्रकाश गावंडे आणि त्यांचा मित्र मंगेश चहुळकर यांनी त्याला एक लाख रुपयांची सुपारी देऊन अपघात घडवून आणण्यास सांगितले होते. योजना अशी होती की अपघातासारखा दिसणारा प्रसंग घडवून वृषाली गावंडे यांचा जीव घ्यायचा. त्यानुसार 2 मार्च रोजी सकाळी वृषाली गावंडे स्कुटीवरून शाळेत जात असताना पातुर्डा ते कवठळ मार्गावर पिकअपने मुद्दाम धडक दिली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
या धक्कादायक खुलाशानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वृषाली गावंडे यांचे पती प्रकाश गावंडे, त्यांचा मित्र मंगेश चहुळकर आणि पिकअप चालक मंगेश सूर्यवंशी या तिघांना अटक केली. जळगाव जामोद पोलिसांनी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आपल्या पत्नीच्या हत्येसाठीच पतीने सुपारी दिल्याचा आरोप समोर आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामागील नेमके कारण काय होते, कौटुंबिक वाद होता की इतर काही कारण होते, याचा तपास पोलिसांकडून पुढे सुरू आहे.









