---Advertisement---
नाशिक शहरातील पंचवटी परिसरातून सायबर फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने सोशल मीडियावरून ओळख करून घेत एका व्यावसायिक तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत तब्बल ५३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीने बनावट फेसबुक प्रोफाइल आणि वेगवेगळ्या व्हाट्सऍप क्रमांकांवरून पंचवटीतील तरुणाशी संपर्क साधला. सततच्या संवादातून तिने तरुणाचा विश्वास संपादन केला आणि हळूहळू त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिने क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगून त्याला गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.
तरुणीने दिलेल्या युनिटी स्मॉल फायनान्स बँकेच्या खात्यांवर तसेच विविध UPI आयडीवर त्या तरुणाने एकूण ५३ लाख रुपये पाठवले. गुंतवणूक केल्यानंतर एका बनावट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ही रक्कम कोट्यवधी रुपयांपर्यंत वाढल्याचे दाखवून तरुणाची दिशाभूल करण्यात आली.
मात्र जेव्हा संबंधित तरुणाने गुंतवलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या तरुणीने आणखी ३४ लाख रुपये भरण्याची मागणी केली. तरुणाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिने त्याला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे समोर आले आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणाने नाशिक सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात तरुणीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. संशयित तरुणीने वापरलेले बँक खाते आणि व्हॉट्सॲप क्रमांक पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.









