रस्त्यावर झोपलेल्या महिलेवरून कार गेल्याने मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

---Advertisement---

 

भुसावळ: शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्ड परिसरातील लहान हनुमान मंदिरासमोरील रस्त्यावर मृतावस्थेत आढळलेल्या अनोळखी महिलेच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित महिला रस्त्यावर झोपलेल्या अवस्थेत असताना तिच्या अंगावरून कार गेल्याचे उघड झाल्याने या प्रकरणात कारचालकाविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी विठ्ठल मंदिर वॉर्डातील लहान हनुमान मंदिरासमोरील रस्त्यावर एक अनोळखी महिला मृतावस्थेत आढळून आली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला.

तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये संबंधित महिला रस्त्यावर झोपलेल्या अवस्थेत असताना एक कार त्या ठिकाणी काही वेळ थांबल्यानंतर तिच्या अंगावरून गेल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी कारचा क्रमांक एमएच-१९-ईजी-३६०० असा असल्याचे ओळखले. चौकशीत ही कार ऋषी शुक्ला यांच्या मालकीची असल्याचे समोर आले. घटनेच्या वेळी ही कार त्यांचा मित्र धनंजय हरचंद महाजन (वय २५, रा. जळगाव) चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

यावरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात धनंजय महाजन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---