---Advertisement---
जळगाव प्रतिनिधी :
शहरात मंगळवारी दुपारी भर दिवसा गोळीबाराची थरारक घटना घडली. वडिलांवर झालेल्या मारहाणीचा राग अनावर झाल्याने संतापलेल्या मुलाने मारहाण करणाऱ्या तिघांच्या दिशेने गावठी कट्ट्यातून दोन राउंड फायर केले. सुदैवाने या गोळीबारात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र या घटनेमुळे शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरकुल चौक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम चौक परिसरातील रसाल राठोड (वय 48) हे मंगळवारी दुपारी नेरी नाक्याजवळील स्मशानभूमी परिसरातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडवून मारहाण केली. या मारहाणीत राठोड यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच त्यांचा मुलगा अनिल राठोड दुचाकीने घटनास्थळाकडे निघाला. घरकुल चौक परिसरात त्याला वडिलांना मारहाण करणारे तिघे संशयित दिसताच संतापाच्या भरात त्याने कमरेला असलेला गावठी कट्टा काढून त्यांच्या दिशेने दोन राउंड फायर केले.
गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच पळापळ उडाली. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस तसेच एलसीबीचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गटातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
गोळीबार झालेल्यांमध्ये प्रशांत चौधरी, हिमांशू शुक्ला, कृष्णा सूर्यवंशी आणि अक्षय तायडे यांचा समावेश आहे. दरम्यान, गोळीबार करून फरार झालेला मुख्य संशयित अनिल राठोड याचा पोलीस शोध घेत आहेत.
या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.









