---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे एकाच रात्री दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीत रोख रक्कम व दागिने लंपास झाल्याची घटना घडली. यामुळे येथे पाळधीत खळबळ उडाली असून नागरीकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाळधी येथील साईबाबा नगरातील रहीवासी सुरेश तुकाराम पाटील हे कामानिमित्त अमळनेर येथे गेले होते. त्यांचे घराला कुलुप होते. नेमके याचीच संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्रीचा सुमारास त्यांच्या घरचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला व तेथील कपाट उघडून त्यात असलेले सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला. दरम्यान आज सकाळी घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला त्यांनी आत प्रवेश करताच घरातील कपाट उघडे दिसले व त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तर भजी गल्ली येथील रहीवासी भुषण प्रभाकर पाटील हे घराला खाली कुलुप लावून वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते. नेमके याचीच संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्रीचा सुमारास त्यांचे घरचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला व कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला.
या दोन्ही घरात मिळुन लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला असून उशिरा पाळधी पोलीसात गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यामुळे नेमके काय चोरीस गेले हे कळत नव्हते. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व त्या परीसरात असलेल्या सीसीटीव्हि ची तपासणी केली. या बाबत पाळधी पोलीसात उशिरा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.









