---Advertisement---
पाचोरा शहरातील हनुमान नगर परिसरात बाथरूममध्ये वॉटर हिटरचा शॉक लागून एका ४४ वर्षीय फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून या घटनेबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाचोरा शहरातील हनुमान नगर परिसरातील ४४ वर्षीय धनराज सुखदेव मिस्तरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनराज मिस्तरी हे दि. ११ तारखेला सकाळी ८ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरातील बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेले होते. यावेळी बाथरूममध्ये लावलेल्या वॉटर हिटरला स्पर्श झाल्याने त्यांना जोराचा विद्युत शॉक बसला. या घटनेत ते जागीच बेशुद्ध पडले.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता धनराज मिस्तरी यांना मृत घोषित केले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत हे करीत आहेत. प्राथमिक तपासात वॉटर हिटरच्या विद्युत प्रवाहामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मयत धनराज मिस्तरी हे फर्निचरचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांचा स्वभाव अत्यंत शांत, मनमिळाऊ आणि मदतीस तत्पर असा होता. त्यांच्या या दुर्दैवी निधनामुळे हनुमान नगरसह परिसरात शोककळा पसरली आहे.









