---Advertisement---
धुळे जिल्ह्यातील देवपूर परिसरातील गाजलेल्या पिता-पुत्र खून प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. धुळे येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने माजी नगराध्यक्षांसह ११ आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
देवपूरातील रावसाहेब पाटील आणि त्यांचा मुलगा वैभव पाटील यांची ८ जून २०१८ रोजी पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर देवपूर पोलीस ठाण्यात १३ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावे आणि इतर नोंदींचा सखोल विचार केल्यानंतर न्यायालयाने १३ पैकी ११ आरोपींना भादंवि कलम ३०२ अंतर्गत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
यामध्ये माजी नगराध्यक्ष बाजीराव ऊर्फ सुभाष सजन पवार, त्यांचा मुलगा गौरव पवार यांच्यासह एकूण ११ जणांचा समावेश आहे. तसेच संदीप ऊर्फ विक्की दिलीप वेळीस या आरोपीला भादंवि कलम २१२ अंतर्गत पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
दरम्यान, या खटल्याचा निकाल लागणार असल्याने गुरुवारी धुळे न्यायालय परिसरात नातेवाईकांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दुपारी साडेतीन वाजता न्यायालयीन कामकाज सुरू झाल्यानंतर सर्व आरोपींना न्यायाधीशांसमोर उभे करण्यात आले आणि त्यानंतर शिक्षा जाहीर करण्यात आली.









