---Advertisement---
जळगाव शहरात सध्या गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना मोठी धावपळ करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. बुकिंग करूनही सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अनेक गॅस एजन्सींना वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रारही नागरिकांकडून केली जात आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थिती तणावपूर्ण असल्यामुळे गॅस पुरवठ्याबाबत विविध अफवा पसरत आहेत. मात्र प्रत्यक्षात जळगाव शहरात अनेक कुटुंबांना सिलेंडर मिळण्यासाठी दिवसन्दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. काही नागरिकांनी एजन्सीकडून फोन उचलला जात नसल्याचा आरोप केला असून, तर काही ठिकाणी सिलेंडर देताना जादा पैसे आकारले जात असल्याचीही तक्रार समोर आली आहे.यामुळे आधीच घरातील गॅस संपलेल्या कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दोन दिवसांपूर्वी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र प्रत्यक्षात बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे.
कोल्हे हिल्स परिसरातील एका नागरिकाने संबंधित एजन्सीविरोधात तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कालिका माता मंदिर रोड परिसरातील एका भारत गॅस एजन्सीला नागरिकांनी सलग तीन दिवस फोन करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित गॅस एजन्सींची चौकशी करून नागरिकांना वेळेवर घरपोच सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.









