---Advertisement---
राज्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशातच आता राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी तापमानाने चाळीशी गाठली आहे. जळगाव, अकोला तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान ३९ ते ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे उष्णतेचे चटके नागरिकांना असह्य होत आहेत. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक थंड पेयांचा आधार घेत असून दुपारच्या वेळी रस्त्यांवरही तुलनेने कमी वर्दळ दिसून येत आहे.
दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवस राज्यातील वातावरणात बदल होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पुणे वेधशाळेच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर सोमवारी कोकण, गोवा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे पुढील काही दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून त्यामुळे वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









