---Advertisement---
भुसावळ : उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे ते दानापूर दरम्यान दररोज विशेष रेल्वे गाडी चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातून बिहार व उत्तर भारतात प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 01449 पुणे–दानापूर विशेष ही गाडी 10 मार्च ते 31 मार्च या कालावधीत दररोज दुपारी 3.30 वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2.45 वाजता दानापूरला पोहोचेल.
तर परतीच्या प्रवासासाठी 01450 दानापूर–पुणे विशेष गाडी 5 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत सकाळी 5 वाजता दानापूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6.15 वाजता पुणे येथे दाखल होईल.
या विशेष सेवेअंतर्गत एकूण 44 फेऱ्या चालवण्यात येणार असून प्रत्येक दिशेने 22 फेऱ्या असतील. त्यामुळे या मार्गावरील तिकीटांची उपलब्धता वाढून प्रतीक्षा यादीवरील ताण काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ही विशेष गाडी अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीत एसी 2 टियर, एसी 3 टियर, स्लीपर क्लास, जनरल डबे तसेच गार्ड ब्रेक व्हॅन अशा विविध श्रेणीतील कोचची व्यवस्था करण्यात आली आहे.
या विशेष गाडीचे तिकीट आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC संकेतस्थळ आणि मोबाइल अॅपवर सुरू करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातून बिहार आणि उत्तर भारतात कामासाठी जाणारे कामगार, विद्यार्थी तसेच कुटुंबीयांसाठी ही विशेष रेल्वे सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.









