---Advertisement---
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेला शासनाने मंजुरी दिल्याने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या प्रकल्पांतर्गत गिरणा डावा व उजवा कालवा, मोसमसाळ कालव्याची क्षमतावाढ आणि विविध स्ट्रक्चरल कामांचे भूमिपूजन लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर बागलाण तालुक्यातील लखमापूर येथे मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची सहविचार सभा पार पडली.
उत्तर महाराष्ट्रातील गिरणा, मोसम, बोरी आणि कान्होळी नदी खोऱ्यातील अनेक भाग दुष्काळी पट्ट्यात मोडतात. या भागाला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी गुजरातमध्ये अरबी समुद्रात वाहून जाणारे नार-पार-औरंगा नद्यांचे पाणी गिरणा उपखोऱ्यात वळविण्याची योजना आखण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ७,४६५.२९ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता ५ सप्टेंबर २०२४ रोजी देण्यात आली आहे.
१.२३ लाख एकर क्षेत्राला पाणी
या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तसेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव आणि एरंडोल तालुक्यांतील एकूण १ लाख २३ हजार ७९० एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.
पहिल्या टप्प्यात मोठी कामे
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १०,६४० दशलक्ष घनफूट पाणी गिरणा खोऱ्यात वळविण्यात येणार असून, सुमारे ४,११६ कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी २० हजार दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध करण्याचा अभ्यास सुरू आहे.
सुमारे १५ तालुक्यांना लाभ देणारा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास, पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होण्यास आणि औद्योगिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून, हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे.









