---Advertisement---
नंदुरबार : शहरात एकाच रात्री गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाने साथीदारांसह धुमाकूळ घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुख्य संशयित आकाश बाबूलाल धनगर याने तरुणावर जातिवाचक शिवीगाळ करत खुनाचा प्रयत्न केला, तर काही वेळातच दुसऱ्या ठिकाणी एका चालकाला अडवून मारहाण करीत २० हजार रुपये लुटल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना १३ मार्चला रात्री अकराच्या सुमारास शहरातील धुळे नाका परिसरातील जैन पेट्रोलपंपाजवळ घडली. फिर्यादी कपिल राजू बैसाणे हे भावाला पाहण्यासाठी गेले असता, तेथे बसलेला आकाश बाबूलाल धनगर (वय २७, रा. संजयनगर) याने ‘हा येथे कसा काय आला?’ असे म्हणून जातिवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर दुचाकीतून धारदार लोखंडी वस्तू काढून
कपिल यांच्या छातीवर ठार मारण्याच्या उद्देशाने वार केला. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम १०९ सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन तपास करीत आहेत.
या घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासात, म्हणजे रात्री पावणेबाराच्या सुमारास आकाश धनगर याने इतर साथीदारांसह छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर रस्त्यावरील भरकादेवी आईस्क्रीम पार्लरसमोर दहशत माजवली. फिर्यादी मौसिम अब्दुल धोबी (वय ३२, चालक) हे वाहनाने जात असताना आकाश धनगर, विजय दिलीप पाटील, ऋषिकेश ऊर्फ राण्या दिलीप मिस्त्री व इतर दोन साथीदारांनी त्यांना अडवले. संशयितांनी मौसिम यांना अश्लील शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी आणि दुचाकीच्या चावीने डोक्यावर व छातीवर मारहाण केली. इतकेच नव्हे, तर त्यांच्या गाडीत ठेवलेले २० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या प्रकरणी दरोडा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज पहले तपास करीत आहेत.
दोन्ही घटनांमधील मुख्य संशयित एकच असल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस निरीक्षक नीलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पुढील कारवाई करीत असून, संशयितांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू आहे.









