---Advertisement---
चाळीसगाव शहरातील हनुमानवाडी परिसरात रविवारी (१५ मार्च) रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत एका रिक्षाचालकाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमी रिक्षाचालकाची ओळख सिकंदर शेख निसार शेख (वय ३६, रा. अनिल नगर, रेल्वे स्टेशनजवळ) अशी झाली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अंकित, मेहुल, कृष्णा शेळते यांच्यासह आणखी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध चाळीसगाव सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास हनुमानवाडी परिसरातील एका शेडमध्ये आरोपींकडे दोन गावठी कट्टे होते. यावेळी अचानक ट्रिगर दाबला गेल्याने गोळी सुटली आणि ती सिकंदर शेख यांच्या उजव्या खांद्यावर लागली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवला असून आरोपींच्या शोधासाठी दोन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी यांचे पथक पुढील तपास करत आहे.









