---Advertisement---
मुंबई: राज्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. कामांना गती देण्यासाठी विभागीय आयुक्तांना अतिरिक्त अधिकार देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मंत्रालयात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विविध भागांतील पाणीपुरवठा योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, आमदार बालाजी किनीकर, सुहास बाबर, अतुल भोसले, सत्यजित देशमुख (दूरदृश्यप्रणालीद्वारे) तसेच अंबरनाथच्या नगराध्यक्ष तेजश्री करंजुले-पाटील उपस्थित होत्या. याशिवाय वरिष्ठ अधिकारी आणि अभियंतेही बैठकीला उपस्थित होते.
अंबरनाथ नगरपरिषद हद्दीत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी गळती रोखण्यासाठी विशेष पथक नेमणे, अनधिकृत नळजोडणी रोखणे आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आवश्यक त्या ठिकाणी उपअभियंत्यांची नियुक्ती करून पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील ४६७ पाणीपुरवठा योजनांपैकी १९७ योजना पूर्ण झाल्या असून १३८ योजना ७५ टक्के पूर्णत्वास आल्या आहेत. उर्वरित योजनांसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देत अपूर्ण कामांना वेग देण्यावर भर देण्यात येणार आहे.
दरम्यान, पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बिलांमुळे महावितरणकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी राज्यस्तरावर स्वतंत्र धोरण आखण्यात येणार आहे, जेणेकरून उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये.
सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी आणि तासगाव तालुक्यांतील योजनांची कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सहाव्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर असून, यामुळे ५० हून अधिक गावांना पाणीपुरवठा होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील उंडाळे पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश देण्यात आले. ही योजना पूर्ण झाल्यानंतर काले, धोंडेवाडी, जखिणवाडी आणि कोयना वसाहतीसह सुमारे ५० हजार लोकसंख्येला शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
राज्यातील अंबरनाथ, दापोली, शिराळा, मंडणगड, खेड, कराड, उंडाळे तसेच सांगली जिल्ह्यातील विविध भागांतील पाणीपुरवठा योजनांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.









