हॉटेलमध्ये बसून जेवण करण्याच्या वादातून तरुणावर रॉडने प्राणघातक हल्ला; नंदुरबार शहरात खळबळ…!

---Advertisement---

 

नंदुरबार शहरातील धुळे-नवापूर रोडवरील एका हॉटेलसमोर किरकोळ वादातून नऊ जणांच्या टोळक्याने फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात एका तरुणाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या नवीन कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय आत्माराम गवळी (वय ३२, रा. जयंती नगर, नंदुरबार) हे त्यांचे वडील आणि चुलत भावासोबत धुळे-नवापूर रोडवरील राजपूत पेट्रोल पंपाजवळील ‘खान्देश जंक्शन ३९’ हॉटेलसमोर होते. यावेळी आरोपींनी “हॉटेलमध्ये येऊन बसून जेवण करा, आम्ही बाहेर ऑर्डर केलेले जेवण हॉटेलच्या बाहेर आणून देत नाही,” असे सांगत वाद उकरून काढला.

या किरकोळ कारणावरून संतापलेल्या संशयित आरोपींनी संगनमताने फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद इतका विकोपाला गेला की, संशयित आरोपी उमेश माळी याने फिर्यादीचा चुलत भाऊ मनोज श्रीलाल साबळे याला जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉडने डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात मनोज साबळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी अक्षय गवळी यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलिसांनी एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात पराग राजेश रघुवंशी, प्रफुल्ल राजेश रघुवंशी, सूर्यकांत खंडू माळी, उमेश माळी (पाणीपुरीवाला), जगदीश माळी, बापू गुरव, जयेश धनराज माळी, जीवन माळी (सर्व रा. नंदुरबार) आणि एका अनोळखी इसमाचा समावेश आहे.

शहर पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न (कलम १०९-१), बेकायदेशीर जमाव जमवणे (कलम १८९, १९१, १९०), आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन (कलम १३५) अशा विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तानाजी बहिरम करत आहेत. शहरात अशा प्रकारे किरकोळ वादातून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक पवित्रा घेतला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---