---Advertisement---
पुणे – वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. हिंजवडी आयटी पार्क येथे तब्बल १,००० पदवीधारक तरुणांची नोकरीच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही माहिती राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत दिली.
या प्रकरणात नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरुणांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात आल्याची तक्रार होती. मात्र पैसे भरूनही नोकरी न मिळाल्याने फसवणूक झालेल्या तरुणांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती.
दरम्यान, या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आयटी क्षेत्रात जबरदस्तीने राजीनामे घेणे, कामावरून कमी करणे यांसारख्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पष्ट नियमावली आणि कायदेशीर संरक्षणाची गरज असल्याचा मुद्दा आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत मांडला.
यावर उत्तर देताना मंत्री फुंडकर यांनी सांगितले की, फसवणूक झालेल्या तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. आयटी क्षेत्रातील कामगारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रथम कामगार विभागामार्फत समेटाचा प्रयत्न केला जातो, आणि तो निष्फळ ठरल्यास प्रकरण कामगार न्यायालय किंवा औद्योगिक न्यायालयात नेले जाते.
तसेच केंद्र सरकारच्या नवीन कामगार संहितेनुसार आयटी क्षेत्रासाठी स्वतंत्र ट्रिब्यूनल स्थापन करण्याची तरतूद असून, संबंधित नियम अंतिम झाल्यानंतर राज्यात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.









