---Advertisement---
शहापूर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिके जमीनदोस्त; शेतकऱ्यांची तातडीच्या मदतीची मागणी
अमळनेर तालुक्यातील शहापूर परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने शेतातील मका पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले असून ऐन काढणीच्या काळात आलेल्या पिकावर पाणी फिरले आहे.
अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेले असून आर्थिक फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे मका पीक पूर्णपणे पडून नष्ट झाले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घट होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पाहणी करून मदतीचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









