वीज कोसळून सहा एकर गव्हाच्या पेंड्या जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

---Advertisement---

 

तालुक्यातील विल्हाळा शिवारात अवकाळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे मोठी दुर्घटना घडली असून सहा एकर क्षेत्रातील गव्हाच्या पेंड्यांचा साठा जळून खाक झाला आहे. या घटनेत शेतकऱ्यांचे सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.


दि. १९ मार्च रोजी रात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळली. यावेळी विल्हाळा शिवारातील दीपक सोपान वारके व नयना दीपक वारके यांच्या गट क्रमांक ७४६ मधील सहा एकर क्षेत्रात गव्हाच्या पेंड्या काढणीसाठी गोळा करून ठेवण्यात आल्या होत्या. मात्र वीज कोसळल्याने संपूर्ण पेंढ्यांचा ढीग पेट घेत जळून खाक झाला.


या घटनेमुळे रब्बी हंगामातील हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून संबंधित कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. आधीच खरीप हंगाम अपेक्षेप्रमाणे न झाल्याने शेतकरी अडचणीत असताना आता रब्बीतील नुकसानामुळे ते हतबल झाले आहेत.
दरम्यान, भुसावळ तालुक्यातील शिंदी, मोंढाळा, मानमोडी व विचवा परिसरातही सायंकाळी ६.४५ ते ८.१५ या कालावधीत सुमारे सव्वातास जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गहू, हरभरा, मका तसेच जनावरांसाठी साठवलेला कडबा-पेंढा यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली.


अचानक आलेल्या पावसामुळे गावकऱ्यांची एकच धावपळ उडाली. शेतीशिवारात पाणी साचल्याने कापणीस आलेल्या पिकांवर परिणाम झाला आहे. गहू भिजल्यास त्याच्या गुणवत्तेवर आणि बाजारभावावरही परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.
शेतकरी वर्गाकडून महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---