---Advertisement---
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप, राजकीय आणि प्रशासनातील मोठ्या लोकांशी असलेले संबंध आणि आता तपासात समोर येत असलेले धक्कादायक खुलासे… या सर्वामुळे हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालले आहे.
स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणारा अशोक खरात सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे महादेवाचे मंदिर उभारून प्रसिद्धीच्या झोतात आला. सुरुवातीला तो ज्योतिष आणि भविष्य सांगण्याच्या नावाखाली लोकांशी संपर्क साधायचा. कुणाला संसारातील अडचणी, कुणाला मूलबाळ न होण्याची समस्या, तर कुणाला नोकरीत प्रगती हवी असायची. अशा विविध कारणांनी लोक खरातच्या दरबारात येऊ लागले… आणि हळूहळू त्याचं जाळं वाढत गेलं.
धक्कादायक म्हणजे, केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी, उद्योजक आणि चित्रपटसृष्टीतील काही व्यक्तीही खरातच्या संपर्कात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. अनेक राजकीय नेतेदेखील त्याच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी जात असल्याचं सांगितलं जात आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, खरात लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी विविध पद्धती वापरत होता. त्यामध्ये त्याने पाळलेला सुमारे २० फुटांचा नाग हा देखील एक महत्त्वाचा भाग असल्याचं सांगितलं जात आहे. या नागाच्या माध्यमातून तो लोकांमध्ये भीती आणि श्रद्धेचं मिश्र वातावरण तयार करत असे. त्यामुळे अनेकजण त्याच्या प्रभावाखाली येत होते.
पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी खरात मोठ्या पूजा आणि विधी आयोजित करायचा. या विशेष दिवसांमध्ये श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांची मोठी गर्दी त्याच्या दरबारात जमायची. अशा प्रकारे त्याने स्वतःभोवती एक ‘आध्यात्मिक’ प्रतिमा तयार केली, जी प्रत्यक्षात फसवणुकीचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात नाशिक पोलिसांनी खरातला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष तपास पथक (SIT) त्याची सखोल चौकशी करत असून, त्याच्या गुन्ह्याची पद्धत आणि संपर्क जाळं उघड होत आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. एवढे मोठे, प्रभावशाली आणि सुशिक्षित लोक अशा भोंदूगिरीला कसे बळी पडले? आणि या मागे अजून किती मोठं जाळं लपलेलं आहे?
या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









