---Advertisement---
कुपवाडा : दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणासंदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकांनी सोमवारी सकाळी जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात गुलुरा भागात आणि कुपवारा जिल्ह्यातील एका व्यावसायिकाच्या घरांवर छापे टाकले. या कारवाईत एनआयएला काही महत्वाची कागदपत्रे हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, पटियाला हाऊस येथील विशेष एनआयए न्यायालयाने डॉ. शाहीन सईद, मुफ्ती इरफान, डॉ. आदिल अहमद, जसीर बिलाल वानी, डॉ. मुजम्मिल, यासिर अहमद दार आणि नासिर बिलाल मल्लासह सात आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवली होती. त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले असता विशेष न्यायाधीश (एनआयए) पीतांबर दत्त यांनी त्यांची न्यायालयीन कोठडी पुढील १५ दिवसांसाठी वाढवली.
११ मार्चला सुनावणीच्या शेवटच्या दिवशी, एनआयएने सांगितले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या हत्येच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनांमुळे या प्रकरणाच्या तपासात अडथळा निर्माण झाला होता. दोन आरोपी तुफैल अहमद भट आणि जमीर अहमद अहंगरला पाच दिवसांसाठी एनआयएच्या कोठडीत ठेवण्यात आले. न्यायालयाने यापूर्वीच तपासाची मुदत ४५ दिवसांनी वाढवली होती.
अहंगर-भट एजीएचचे सक्रिय सदस्य
अन्सार गझवत-उल- हिंद (एजीएच) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून जम्मू आणि काश्मीरमधील दोन व्यक्तींना अटक करण्यात आली. एका निवेदनात, एनआयएने म्हटले की, दोन्ही आरोपी जमीर अहमद अहंगर आणि तुफैल अहमद भट हे एजीएचचे सक्रिय ओव्हर-ग्राउंड वर्कर्स (ओजीडब्ल्यू) आहेत, त्यामुळे या प्रकरणातील अटकेची एकूण संख्या ११ झाली आहे.









