लग्नपत्रिकेच्या नावाखाली सायबर फसवणूक; APK फाईल उघडताच खात्यातून ९१ हजार रुपये गायब…

---Advertisement---

 

मुक्ताईनगर शहरात सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, लग्नपत्रिकेच्या नावाखाली पाठवण्यात आलेली बनावट APK फाईल उघडताच एका नागरिकाच्या बँक खात्यातून तब्बल ९१ हजार रुपये परस्पर काढण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकारामुळे मुक्ताईनगर शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील वासुदेव भंगाळे यांना ७ मे रोजी त्यांच्या परिचित मित्राच्या व्हॉट्सअॅप नंबरवरून लग्नपत्रिकेचा मेसेज आला होता. ओळखीच्या व्यक्तीकडून मेसेज आल्यामुळे त्यांनी कोणताही संशय न घेता त्या मेसेजसोबत आलेली APK फाईल मोबाईलमध्ये उघडली.

मात्र, ही फाईल ओपन करताच सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मोबाईलचा ताबा घेत बँकिंग माहिती हॅक केली आणि काही वेळातच खात्यातून ९१ हजार रुपये परस्पर काढून घेतले. बँक खात्यातून पैसे डेबिट झाल्याचे मेसेज आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

या घटनेतील आणखी धक्कादायक बाब म्हणजे संबंधित मित्राचे व्हॉट्सअॅप अकाउंटही हॅक करण्यात आल्याचे समोर आले आहे. सायबर गुन्हेगार आता ओळखीच्या व्यक्तींचे अकाउंट हॅक करून त्याच नावाने बनावट मेसेज पाठवत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. फसवणूक लक्षात येताच वासुदेव भंगाळे यांनी तात्काळ सायबर क्राईम विभागाकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सुरू असून अत्याधुनिक पद्धतीने ही सायबर चोरी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा APK फाईल्समध्ये मालवेअर लपवलेले असते. फाईल डाउनलोड किंवा इंस्टॉल केल्यानंतर मोबाईलमधील बँकिंग माहिती, OTP, पासवर्ड आणि वैयक्तिक डेटा हॅकर्सच्या ताब्यात जातो. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही संशयास्पद लिंक किंवा फाईल उघडताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ओळखीच्या व्यक्तीकडून मेसेज आला तरी खातरजमा केल्याशिवाय कोणतीही फाईल डाउनलोड करू नये आणि APK स्वरूपातील फाईल्सपासून सावध राहावे, असा इशाराही सायबर विभागाकडून देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---