---Advertisement---
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त करत न्याय मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
दीपक छगन भिल असे मृत तरुणाचे नाव असून, तो एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत काम करत होता. काम सुरू असताना तो अचानक दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दीपकला तातडीने जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
तरुणाच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. यावेळी पोलिसांनी आमच्या परवानगीशिवाय आणि माहिती न देता पोस्टमार्टम केल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पंचनामा आणि पोस्टमार्टम प्रक्रियेदरम्यान आम्हाला कुठलीही माहिती देण्यात आली नाही, असा दावा नातेवाईकांनी केला.
मात्र, दीपकचा मृत्यू अपघाती नसून संशयास्पद असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी यावेळी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जोपर्यंत दीपकला न्याय मिळत नाही आणि घटनेचा सत्य उघड होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा ठाम पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, मृत्यू नेमका कसा झाला याबाबत चौकशी केली जात आहे.









