मोठी बातमी I सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ! ५ लाखांची लाच स्वीकारताना शाखा अभियंता जाळ्यात

---Advertisement---

 

भ्रष्टाचाराचे केंद्र म्हणून अनेकदा चर्चेत येणारा जळगावचा सार्वजनिक बांधकाम विभाग पुन्हा एकदा हादरला आहे. एका मक्तेदाराचे थकीत बिल मंजूर करण्याच्या बदल्यात ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना शाखा अभियंता योगेश अहिरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली. १५ लाखांच्या मागणीपैकी पहिला हप्ता स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.


मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार मक्तेदाराचे सार्वजनिक बांधकाम विभागातील एका कामाचे बिल प्रलंबित होते. हे बिल मार्गी लावण्यासाठी शाखा अभियंता योगेश अहिरे यांनी मक्तेदाराकडे १५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने मक्तेदाराने तातडीने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.


प्राप्त तक्रारीची गांभीर्याने दखल घेत एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. शनिवारी दुपारच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरातच सापळा रचण्यात आला. तडजोडीनंतर ठरलेली ५ लाख रुपयांची रक्कम स्वीकारत असतानाच दबा धरून बसलेल्या पथकाने अहिरे यांना रंगेहाथ पकडले.


या धडाकेबाज कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जळगाव शहरात या कारवाईची मोठी चर्चा असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध एसीबीने उगारलेल्या या डंड्यामुळे सर्वसामान्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जात असून, यात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---