---Advertisement---
तळोदा शासकीय वसतिगृहातील भोजन पुरवठा देयकांमध्ये कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणात तळोदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी उत्तम नागोजी राऊत यांना पोलिसांनी अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असताना झालेल्या या गैरव्यवहारामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१६ ते २०२० या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथील आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्पांतर्गत चालवल्या जाणाऱ्या शासकीय वसतिगृहांमध्ये भोजन पुरवठा देयकांमध्ये सुमारे २० ते २५ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमताने बनावट हजेरीपत्रके तयार करून विद्यार्थ्यांची संख्या कृत्रिमरीत्या वाढवून दाखवली आणि त्याआधारे खोटे देयक सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार १३ जून २०२५ रोजी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात एकूण पाच अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यात उत्तम नागोजी राऊत यांच्यासह दिलीप खोकले, सुरेंद्र कावरे, शाम देशमुख आणि बळीराम गडमे यांचा समावेश आहे.
आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०९, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या सर्वांवर शासनाची फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि निधी अपहार केल्याचे गंभीर आरोप आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी उत्तम नागोजी राऊत यांना अटक करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे पथक मंगळवारी अचानक तळोदा येथे दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव आणि अंमलदार अंकुश वाघ यांच्या पथकाने कोणालाही सुगावा लागू न देता थेट प्रकल्प कार्यालयात जाऊन राऊत यांना ताब्यात घेतले.
अटक केल्यानंतर त्यांना तत्काळ छत्रपती संभाजीनगरला रवाना करण्यात आले असून आज (बुधवार) न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या अचानक झालेल्या कारवाईमुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात दिवसभर चर्चेचा विषय ठरला होता. या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून, आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









