---Advertisement---
बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्याविरोधात पान मसाल्याच्या कथित दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीच्या प्रकरणात मोठी कायदेशीर कारवाई सुरू झाली असून, न्यायालयाने पोलिसांना कडक निर्देश दिले आहेत. या घडामोडींमुळे सलमान खान अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर जिल्हा ग्राहक आयोग क्रमांक २ यांनी सलमान खान यांच्याविरोधात जारी केलेल्या जामीनपात्र वॉरंटच्या अंमलबजावणीसाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या पथकाला मुंबईत जाऊन सलमान खान यांना वॉरंट बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रकरणात आयोगाने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर ६ एप्रिल रोजी सलमान खान, तसेच पान मसाला कंपनीचे संचालक राकेश चौरसिया आणि दिनेश कुमार चौरसिया आयोगासमोर हजर झाले नाहीत, तर त्यांच्या विरोधात अटकेचे वॉरंट जारी केले जाऊ शकते.
तक्रारदार योगेंद्र सिंग यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, संबंधित पान मसाल्याच्या जाहिरातीत उत्पादन ‘केशरयुक्त’ असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र उत्पादनाची किंमत पाहता त्यामध्ये प्रत्यक्ष केशर असणे शक्य नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आयोगाचे अध्यक्ष जी.एल. मीणा आणि सदस्य सुप्रिया अग्रवाल, अजय कुमार यांच्या खंडपीठाने या प्रकरणात कडक भूमिका घेत, “कोणतीही व्यक्ती सेलिब्रिटी असली तरी ती कायद्यापेक्षा मोठी नाही,” असे स्पष्टपणे नमूद केले आहे. वॉरंटची अंमलबजावणी न होणे ही कायद्याची थट्टा असल्याचेही आयोगाने म्हटले आहे.
या प्रकरणामुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली असून, पुढील सुनावणीदरम्यान काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









