---Advertisement---
वैजापूर (ता. चोपडा): रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ बनविण्याच्या कार्यशाळेमुळे महिला सबलीकरणासोबतच उपजीविकेच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास आदिवासी विकास विभाग यावलचे सहायक प्रकल्प अधिकारी सतिश पाटील यांनी व्यक्त केला.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच दत्तर सिंग पावरा, वनरक्षक विजय शिरसाठ, प्रशिक्षक डॉ. सतीश गोगुलवार, शालिनीताई, अध्यक्ष गिरीश कुळकर्णी, मानद सचिव सुभाष अमळनेरकर, संवाद सचिव पंकज व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली. प्रशांत सूर्यवंशी यांनी प्रेरणादायी गीत सादर केले.
यावेळी बोलताना सरपंच दत्तर सिंग पावरा यांनी मोहफुलांचा वापर केवळ दारू निर्मितीसाठी होत असल्याची पूर्वीची समजूत असल्याचे सांगितले. मात्र, या कार्यशाळेमुळे मोहफुलांपासून विविध पौष्टिक पदार्थ तयार करता येतात, ही नवी माहिती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. वनरक्षक विजय शिरसाठ यांनी वनसंपदेचे संवर्धन व मूल्यवर्धन करण्याची गरज अधोरेखित केली.
प्रशिक्षक डॉ. सतीश गोगुलवार यांनी कार्यशाळेतून मिळालेले ज्ञान प्रत्यक्षात वापरण्याचे आवाहन केले. महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेत मोहफुलांचा चिवडा, लाडू व केक बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून ३८ आदिवासी महिलांनी सहभाग घेतला आहे. दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप शुक्रवार, २७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुभाष अमळनेरकर यांनी मानले.
आज जळगावात डॉ. सतीश गोगुलवार यांचे व्याख्यान
रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आरोग्य तज्ज्ञ डॉ. सतीश गोगुलवार यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे व्याख्यान शुक्रवार, २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता रोटरी हॉल, गणपती नगर, जळगाव येथे होणार आहे. ‘आमच्या आरोग्यासाठी’ या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत.
डॉ. गोगुलवार हे सर्वोदय चळवळीतील कार्यकर्ते असून महात्मा गांधी व जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. गडचिरोलीतील आदिवासी भागात त्यांनी आरोग्य, जल, जंगल व जमीन या विषयांवर गेल्या चार दशकांपासून कार्य केले आहे. त्यांना २०२४ चा इंटरनॅशनल ह्युमॅनिटरिअन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या व्याख्यानाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.









