---Advertisement---
नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसची वाढती मागणी लक्षात घेता पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन, तेल कंपन्या आणि वितरकांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी व साठेबाजी टाळून संयम बाळगावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या बैठकीत पेट्रोल-डिझेल पंपचालक, गॅस वितरक, तसेच तेल कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री महाजन म्हणाले की, सध्या इंधनाची मागणी दीडपट वाढल्याने काही ठिकाणी तात्पुरती कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता इंधन साठविणे टाळावे. पंपांवरील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी नम्रतेने व संयमाने वागावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
दरम्यान, घरपोच गॅस सिलिंडर वितरणात काही प्रमाणात विलंब होत असून बायोमेट्रिक ई-केवायसी पूर्ण केलेल्या ग्राहकांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ओटीपी-आधारित वितरण पद्धती प्रभावीपणे राबवल्यास गर्दी कमी होऊ शकते, असे वितरकांनी सांगितले. घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत असला तरी व्यावसायिक सिलिंडरमध्ये काही अडचणी असल्याचेही स्पष्ट झाले.
पेट्रोल-डिझेल वितरकांनी बैठकीत क्रेडिट सुविधा पुन्हा सुरू करणे, आगाऊ रक्कम भरल्यानंतर तात्काळ टँकर उपलब्ध करून देणे, रविवारी डेपो सुरू ठेवणे आणि पंपांवर पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली.
तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, पुरवठा पुरेसा असूनही अफवांमुळे काही तासांतच इंधन संपत आहे. काही ठिकाणी साठेबाजीमुळे ताण वाढत असून नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळणे आवश्यक आहे.









