---Advertisement---
मन्यारखेडा येथील विश्वातील एकमेव ग्रह, राशी व नक्षत्र मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला दिनांक 28 मार्च संध्याकाळी जलयात्रेने उत्साहात प्रारंभ झाला. हा सोहळा 28 मार्च ते 10 एप्रिल 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे.
संध्याकाळी काढण्यात आलेल्या भव्य कलशयात्रेचा प्रारंभ चिमुकले राम मंदिर, नवीन बस स्थानक येथून झाला. स्वातंत्र्य चौक, नेरी नाका, पांझरापोळ टाकी, तेली चौक, विठ्ठल मंदिर, भाग्यलक्ष्मी टेन्ट मार्गे कालिका माता मंदिर येथे यात्रेचा समारोप झाला.
या जलयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील विविध पवित्र नद्यांचे तसेच समुद्राचे जल 51 कलशांमध्ये भरून महिलांकडून ही कलशयात्रा काढण्यात आली. यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी भक्तांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
यात्रेत उंट, बग्गी तसेच मोटू-पटलू, तात्या विचू, डोरेमॉन या आकर्षक बाहुल्यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लक्ष वेधले. याशिवाय गावातील 12 वर्षांपर्यंतच्या मुलींच्या लेझीम पथकाने आणि मुलांच्या ढोल पथकाने वातावरण अधिकच रंगतदार केले.
या कलशयात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण गावात भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पुढील दिवसांत होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









