---Advertisement---
चंदीगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सेक्टर 37 परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाबाहेर झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारनंतर सुमारे साडे चारच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका जोरदार होता की तो दूरपर्यंत ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
स्फोटामुळे कार्यालयाबाहेरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे नुकसान झाले असून काही गाड्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेत सील केला असून सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, प्राथमिक तपासात हा स्फोट कमी तीव्रतेचा म्हणजेच लो-इंटेन्सिटी ब्लास्ट असल्याचे समोर आले आहे. मात्र, नेमका स्फोट कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही पोलिसांकडून केली जात आहे.
या स्फोटाच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, हा प्रकार नेमका काय आहे याचा तपास सध्या सुरू आहे. पुढील तपासानंतरच या प्रकरणातील खरी कारणे समोर येणार आहेत.









