---Advertisement---
जळगाव शहरात घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटना वाढत असताना आता चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच उचलून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील पोलन पेठ परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुमारे ९ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
या प्रकरणी इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे शाखा व्यवस्थापक हरिष विजय गांधी (वय ३७) यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला असून संशयितांचा शोध घेतला जात आहे.
पोलन पेठेतील सत्यम प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर संबंधित बँकेची शाखा आणि एटीएम आहे. गुड फ्रायडेच्या सुट्टीमुळे एटीएममध्ये मोठी रोकड ठेवण्यात आली होती. पहाटे १ ते १.३० वाजण्याच्या दरम्यान चार अज्ञात व्यक्तींनी एटीएममध्ये प्रवेश केला. त्यांनी मशीनला जाड दोर बांधून वाहनाच्या मदतीने ते ओढून खाली पाडले आणि काही मिनिटांतच चारचाकी वाहनात टाकून तेथून पसार झाले.
घटनेनंतर एटीएम केंद्रातील काचा फुटलेल्या अवस्थेत आढळल्या. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये संपूर्ण प्रकार कैद झाला असून त्यात चार संशयित स्पष्टपणे दिसत आहेत. चोरीत अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किंमतीचे एटीएम मशीन आणि त्यामधील सुमारे ७ लाख रुपयांची रोकड असा एकूण ९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.
या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.









