---Advertisement---
नवी दिल्ली : समान नागरी कायदा आणि एक राष्ट्र, एक निवडणूक ही दोन भाजपाची मागे पडलेली कामे आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. या विषयांवर गंभीर चर्चा सुरू असून त्यात सकारात्मक प्रगती असल्याचे ते म्हणाले.
१९९४ मध्ये महिला आरक्षणाचा मुद्दा सर्वप्रथम भाजपानेच उपस्थित केला होता. दुसरीकडे सध्याचे भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार लोकसभा आणि विधानसभांत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारा महिला आरक्षण कायदा २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लागू केला जाईल, हे सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे, असे नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या ४७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आभासी स्वरूपात संबोधित करताना सांगितले.
काँग्रेसच्या राजवटीत भाजपा कार्यकर्त्यांनी आणिबाणी आणि दडपशाहीसारख्या अनेक हालअपेष्टा सहन केल्या, असे काँग्रेसवर टीका करताना मोदी यांनी सांगितले. भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी तर आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. पश्चिम बंगाल आणि केरळसारख्या राज्यांमध्ये हे दिसून आले आहे. या राज्यांमध्ये हिंसेचे रूपांतर एका राजकीय संस्कृतीमध्ये करण्यात आले आहे.
आपली मोहीम अद्याप सुरू आहे. समान नागरी कायदा आणि एक राष्ट्र, एक निवडणूक तसेच इतर मुद्यांवर देशात गांभीयनि चर्चा केली जात आहे. या आघाड्यांवर आपण लक्षणीय यश मिळविले आहे. देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणे हे भाजपाचे उद्दिष्ट आहे आणि भाजपा सातत्याने त्या दिशेने चालत राहील, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी भाजपा मनापासून प्रयत्न करीत आहे, असे ते म्हणाले.
‘वसुधैव कुटुम्बकम् ‘वर भाजपाचा विश्वास
युद्धाचा काळ असला, तरी भाजपाचा ‘वसुधैव कुटुम्बकम्’ वर ठाम विश्वास आहे, असे नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील संघर्षाचा संदर्भ देत सांगितले. एक काळ असा होता, जेव्हा भारत प्रत्येक देशापासून समान अंतर राखण्यात अभिमान बाळगत असे. परंतु, आता मात्र प्रत्येक देशाशी जवळचे संबंध राखून पुढे वाटचाल करीत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.









