जालन्यात निघतोय ज्वालामुखी? व्हिडिओ व्हायरल, परिसरात भीती; सत्य समोर येताच सर्वजण झाले थक्क….!

---Advertisement---

 

जालना शहरात ५ एप्रिल रोजी एक धक्कादायक आणि गोंधळ निर्माण करणारी घटना समोर आली होती. शहरातील सामनगाव रोड परिसरात जमिनीतून लाव्हासारखा लालभडक पदार्थ बाहेर येत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी हा प्रकार ज्वालामुखीचा असल्याचा अंदाज व्यक्त केला, मात्र आता या घटनेमागील खरे कारण समोर आले आहे.

महावितरणने या संपूर्ण घटनेचा तपास करत स्पष्ट केले आहे की, हा कोणताही नैसर्गिक चमत्कार किंवा ज्वालामुखी नसून, विद्युत यंत्रणेमधील तांत्रिक बिघाडामुळे घडलेला प्रकार आहे. महावितरणच्या माहितीनुसार, सामनगाव रोडवरील ११ केव्ही सॅटेलाइट फीडरचा कंडक्टर तांत्रिक दोषामुळे ‘व्ही-क्रॉस आर्म’ आणि ‘आरएसजे पोल’च्या संपर्कात आला होता. यामुळे उच्च दाबाचा विद्युत प्रवाह थेट खांबातून जमिनीत उतरला.

ज्या ठिकाणी हा विद्युत प्रवाह उतरला, ती जागा अत्यंत खडकाळ असल्यामुळे आणि योग्य अर्थिंग न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली. या तीव्र उष्णतेमुळे तेथील खडक वितळले आणि ते लालभडक लाव्हासारखे दिसू लागले. हाच दृश्य नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर शेअर केला आणि काही वेळातच तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.


घटनेची माहिती मिळताच महावितरणचे पथक आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत तांत्रिक बिघाड दुरुस्त केला. रविवारी सायंकाळी सुमारे ४ वाजून ४५ मिनिटांनी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

महावितरणचे प्र. अतिरिक्त कार्यकारी अभियंता सचिन घुलाने यांनी स्पष्ट केले की, हा केवळ तांत्रिक दोष होता आणि यामागे कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा ज्वालामुखीचा संबंध नाही. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परिसरातील सर्व विद्युत खांबांची अर्थिंग नव्याने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही माहिती अधिकृत स्त्रोतांकडूनच तपासून घ्यावी. या घटनेमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---