---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुण येथे कौटुंबिक वादातून लाठ्या काठ्यांनी हाणामारीची गंभीर घटना घडली असून, या प्रकरणामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास फिर्यादी महिला आपल्या कुटुंबीयांसह घरासमोर बसली असताना गावातील एका व्यक्तीने किरकोळ कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली. शाब्दिक वाद वाढत गेला. त्याने त्याच्या साथीदारांना घटनास्थळी बोलावले. यानंतर काही वेळातच सात जण लाठ्या-काठ्यांसह तेथे दाखल झाले आणि कोणतीही चर्चा न करता थेट हल्ला चढवला. या हल्ल्यात फिर्यादीच्या सासूच्या हाताला गंभीर दुखापत झाली, तर पतीसह इतर नातेवाईकांनाही मारहाण करण्यात आली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या महिलांनाही मारहाण करण्यात आल्याने परिस्थिती अधिकच बिघडली.
गावकऱ्यांनी हस्तक्षेप करून भांडण मिटवलं, मात्र हल्लेखोरांनी निघताना पुन्हा धमक्या दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.









