---Advertisement---
भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत अनेक जिल्ह्यांमध्ये चैन स्नॅचिंग (साखळी चोरी) करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला जेरबंद केले आहे. सादिक अली उर्फ ‘आतंक’ इबादत अली इराणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये फरार होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त माहितीद्वारे आरोपीच्या हालचालींबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने (डी.बी. स्क्वॉड) सापळा रचत अत्यंत शिताफीने कारवाई करून सादिक अली याला ताब्यात घेतले. तो बाजारपेठ पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात अनेक दिवसांपासून फरार होता.
आरोपी सादिक अली याने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये चैन स्नॅचिंगचे गुन्हे केले आहेत. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुका, जिल्हापेठ, चाळीसगाव शहर आणि चाळीसगाव ग्रामीण या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. याशिवाय वर्धा, बुलढाणा (शेगाव, नांदुरा, खामगाव), धुळे आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही तो ‘मोस्ट वॉन्टेड’ म्हणून शोधात होता.
ही संपूर्ण कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सदर कारवाईदरम्यान पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकातील हवालदार विजय नेरकर, कांतीलाल केदारे, प्रशांत सोनार, भूषण चौधरी, योगेश माळी, जावेद शहा, दिलीप कोल्हे, सचिन चौधरी, महेंद्रसिंग पाटील, अमर आढाळे, चंद्रकांत रायपूरकर, कोतकर आणि जीवन कापडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कुख्यात गुन्हेगाराच्या अटकेमुळे राज्यातील विविध ठिकाणी घडलेल्या चैन स्नॅचिंगच्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.









