बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू, जळगाव शहरातील मास्टर कॉलनीतील घटना….!

---Advertisement---

 

जळगाव शहरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर काम करताना घडलेल्या एका हृदयद्रावक अपघातात ३२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला आहे. पाचव्या मजल्यावरून खाली कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील शेरा चौकात एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. सोमवारी, १३ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास मुकेश गोकुळ सोनार हे इमारतीच्या पाचव्या मजल्यावर काम करत होते.

मुकेश सोनार हे इमारतीवर काम करत असताना यावेळी बांधकामाचा काही भाग अचानक धसल्याने त्यांचा तोल गेला आणि ते थेट खाली कोसळले. मोठ्या आवाजामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ मदत करत मुकेश सोनार यांना गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर बांधकामस्थळी कामगारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. काम सुरू असताना आवश्यक सुरक्षा साधने आणि खबरदारी घेतली गेली होती का, याची चौकशी होण्याची मागणी होत आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे सोनार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---