---Advertisement---
जळगाव शहर महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या स्वीकृत नगरसेवक पदांसाठी आज बुधवारी १५ एप्रिल रोजी झालेल्या विशेष महासभेत सर्वपक्षीय सात उमेदवारांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीत भारतीय जनता पक्षाचे ४, शिवसेना (शिंदे गट) २ आणि शिवसेना (ठाकरे गट) १ अशा सदस्यांचा समावेश आहे.
जळगाव शहर महानगरपालिकेच्या महासभेत पीठासीन अधिकारी तथा महापौर दीपमाला काळे यांनी निवड झालेल्या सदस्यांची अधिकृत घोषणा केली. यामध्ये भाजपकडून डॉ. राधेश्याम चौधरी, रमेश मतानी, प्रदीप रोटे, सुभाष शौचे, शिवसेना (शिंदे गट) कडून हर्षल मावळे व नरेंद्र आत्माराम पाटील, तर शिवसेना (ठाकरे गट) कडून शरद तायडे यांची निवड जाहीर करण्यात आली.
स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीनंतर महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी नवनियुक्त सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या विशेष महासभेला स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगर सचिव सतीश शुक्ला यांच्यासह अधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आता जळगाव महापालिकेतील एकूण नगरसेवकांची संख्या ८२ झाली आहे. नव्या निवडीमुळे भाजपची संख्या ४६ वरून ५० झाली असून शिवसेनेची २५ तर ठाकरे गटाची ७ झाली आहे.
महासभा संपल्यानंतर नवनियुक्त नगरसेवकांच्या समर्थकांनी महानगरपालिका परिसरात जल्लोष साजरा केला. ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.









