---Advertisement---
एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे दि.११ एप्रिल रोजी रात्री टी.टी.एस.चौक आणि गरीब नवाज चौक परिसरात आर्थिक व्यवहार व जुन्या वादातून मारहाण आणि नुकसानीच्या दोन परस्पर संबंधित घटना घडल्या आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या असून, कासोदा पोलिसात परस्पर विरोधी १३ जणांवर गुन्हे दाखल करत अटक करण्यात आली आहे.
प्रथम घटनेत, फियार्दी शोएब मुन्सफखान यांच्या तक्रारीनुसार, पूर्वीच्या आर्थिक व्यवहारातून सुरू असलेल्या वादातून आरोपी हसिनखान जमशेरखान आणि त्याच्या सात साथीदारांनी फियार्दीस टी. टी.एस. चौकात अडवून शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण केली. यात फियार्दीच्या हाताला व डोक्याला दुखापत झाली. तसेच, त्याच रात्री उशिरा फियार्दीचा भाऊ शाकिब यास आरोपी हकीमखान उर्फ काल्या आणि त्याच्या साथीदारांनी धारदार हत्याराने मारहाण केली. ज्यात त्याच्या पायवर व चेहऱ्यावर दुखापत झाली.
दुसऱ्या घटनेत, फियार्दी हसीन खान जमशेर खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शोएब खान मुन्नाफ खान आणि इतर सहा आरोपींनी फियार्दीच्या दुकानात प्रवेश करून पैशांच्या व्यवहारावरून वाद घातला. आरोपींनी फियार्दीस मारहाण करून लोखंडी फायटरने तोंडावर, ओठावर आणि डोळ्यावर दुखापत केली. तसेच, गळ्यातील चांदीची चैन जबरदस्तीने तोडून नुकसान केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. दोन्ही घटनांमध्ये संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.
त्यानंतर त्यांना एरंडोल कोर्टात हजर केले असता सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर सर्व संशयितांची जळगाव येथील उपकारागृहात रवानगी केली आहे. गुन्ह्यांचा पुढील तपास कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. श्रीकांत पाटील व पी.एस.आय. धर्मराज पाटील करीत आहेत.









