---Advertisement---
धुळे शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातल्या महाराणा प्रताप चौक परिसरात दोन मित्रांना अडवून मारहाण करत एका तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी केशव विजय चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आणि त्यांचा मित्र यश सूर्यवंशी हे दि.16 एप्रिल रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता दुचाकीने जात असताना ही घटना घडली. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दादू सतिष गवळी आणि त्याच्या एका साथीदाराने त्यांना अडवले. दोघांनाही मारहाण करत आरोपींनी यश सूर्यवंशी यांच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून नेली. घटनेनंतर फिर्यादीने तात्काळ पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी संशयित दादू गवळी (रा. मनमाड जीन, धुळे) आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत असून धुळे शहरात वाढत्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.









