---Advertisement---
अमळनेर येथील श्री सद्गुरू सखाराम महाराज संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या महिनाभराच्या यात्रा उत्सवाला यंदाही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर उत्साहात प्रारंभ झाला. समाधी मंदिर परिसरात पारंपरिक विधींसह ध्वजारोहण व स्तंभारोहन सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला.
उत्सवाच्या प्रारंभी संस्थानच्या वारकऱ्यांकडून समाधी मंदिर परिसरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी संत सखाराम महाराज गादीपती प्रसाद महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पुढे श्री जयदेव विकास देव व सहकाऱ्यांनी पौरोहित्य पार पाडत धार्मिक विधी पूर्ण केले. ध्वज स्तंभाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. “विठ्ठल विठ्ठल” च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
समाधी मंदिर परिसरात आकर्षक कमानी, बॅनर व सजावट करण्यात आली होती. दारोदारी रांगोळ्यांनी उत्सवाचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांना यात्रोत्सवाची पत्रिका देण्यात आली असून पहिली पत्रिका आमदार अनिल पाटील यांना प्रदान करण्यात आली.
या प्रसंगी नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बावीस्कर, माजी आमदार शिरीष चौधरी, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार सुरेंद्र सुराणा, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, सेवेकरी व मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.
दि. १९ एप्रिल रोजी सकाळी समाधी मंदिर परिसरात पारंपरिक विधींनी स्तंभारोहन व ध्वजारोहण करण्यात येऊन उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दि. १९ ते २६ एप्रिल या कालावधीत दररोज सकाळी श्री संत तुकाराम महाराज गाथा भजनाचे आयोजन करण्यात आले असून विविध भजन मंडळांचा यात सहभाग आहे.
दि. २५ एप्रिल रोजी सायंकाळी ह.भ.प. प्रल्हाद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ह.भ.प. जयदेव बुवा यांचे कीर्तन होणार आहे. तर दि. २६ एप्रिल रोजी ह.भ.प. मोहन महाराज बेलापुरकर यांचे आगमन होऊन रात्री दिंडी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मोहिनी एकादशी निमित्त दि. २७ एप्रिल रोजी रथोत्सव असतो. यात आदिवासी सांस्कृतिक कला मंडळ, नाशिक यांचे विशेष सादरीकरण होणार आहे. दि. ३० एप्रिल रोजी संत सखाराम महाराज पुण्यतिथी (प्रमुख दिवस) साजरी होत असून यानिमित्त सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवाचा समारोप दि. १ मे रोजी पालखी विसर्जन सोहळ्याने होणार असून, दि. २ मे रोजी ह.भ.प. मोहन महाराज बेलापुरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.
महिनाभर चालणाऱ्या या उत्सवामुळे अमळनेर शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. सर्वच धार्मिक कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेने केले आहे.









