---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तब्बल चार ते पाच तास ठिय्या आंदोलन केलं आहे.
एरंडोल शहरातील स्थानिक गुटखा विक्रेत्यांकडून खंडणी उकळल्याचा आरोप असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणी करण्यात आली होती. आमदारांसोबत मोठ्या संख्येने कार्यकर्तेही एरंडोल पोलिस ठाण्यात जमले होते, त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
वारंवार मागणी करूनही तात्काळ गुन्हा दाखल होत नसल्याने आमदार अमोल पाटील यांनी संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. दुपारपासून सुरू झालेल्या या ठिय्या आंदोलनानंतर अखेर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचा गंभीर आरोप करत आमदारांनी सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत बोलताना पोलिस प्रशासनाने सांगितले की, संबंधित अधिकारी सरकारी कर्मचारी असल्याने कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे संपूर्ण चौकशी करूनच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र, पत्रकारांशी बोलताना पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव उघड करण्याचे टाळले.









