---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती सुधारल्यानंतर केळीच्या बाजारपेठेत मोठी तेजी दिसून येत असून अवघ्या महिनाभरात दरात तब्बल १४०० ते १५०० रुपयांची वाढ झाली आहे.
गेल्या महिन्यात इराण-अमेरिका तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ विस्कळीत झाली होती. त्याचा परिणाम म्हणून केळीचे दर कोसळून प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपयांपर्यंत खाली आले होते. या घसरणीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते.
मात्र आता परिस्थिती हळूहळू सुधारत असून निर्यात पुन्हा सुरळीत होत आहे. त्यामुळे केळीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या केळीचे दर १७०० ते २१०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत.
दरम्यान, कडक उन्हामुळे केळीची आवक काहीशी घटली असली तरी बाजारात मागणी कायम आहे. व्यापाऱ्यांच्या मते, सध्याची ही तेजी पुढील किमान महिनाभर टिकून राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना या दरवाढीमुळे मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.









