---Advertisement---
मिर्झापूर : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात ट्रक, ट्रेलर, स्विफ्ट कार आणि बोलेरो एकमेकांना धडकल्याने मोठा स्फोट आणि आग लागली. या अपघातात दोन निष्पाप मुलांसह ११ जणांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास रेवा-मिर्झापूर महामार्गावरील ड्रमंडगंज खोऱ्यात घडली. उतारावर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला, असे सांगण्यात येत आहे.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर लगेचच गाड्यांमधील लोक किंचाळू आणि आरडाओरडा करू लागले. त्यानंतर, एका मोठ्या स्फोटासह स्विफ्ट कार आणि बोलेरोला आग लागली. आग इतकी भीषण होती की, बचावकार्य सुरू होईपर्यंत गाड्यांमधील लोकांच्या किंकाळ्या थांबल्या होत्या. माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. या अपघातात ११ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अझीझ खान यांना रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडीने भरलेला एक ट्रेलर ड्रमंडगंज खोऱ्यातून खाली उतरत होता. त्याच्यामागे एक स्विफ्ट कार होती. त्या कारच्या मागे डाळींनी भरलेला एक ट्रक आणि त्याच्याही मागे एक बोलेरो होती. दरम्यान, डाळींनी भरलेल्या एका ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाले आणि तो पुढे जाणाऱ्या स्विफ्ट कारला धडकला. धडकेनंतर, स्विफ्ट कार पुढच्या ट्रेलरला धडकली. मागून येणाऱ्या बोलेरो चालकाचेही नियंत्रण सुटले आणि ती ट्रकला धडकली. धडक इतकी जोरदार होती की, बोलेरोला तात्काळ आग लागली. बोलेरोला आगीच्या ज्वाळांनी वेढल्यामुळे आत प्रवासी अडकले. ट्रकचालक बाहेर पडण्यात यशस्वी झाला, परंतु बोलेरोमधील प्रवासी बाहेर पडू शकले नाहीत.
मृतांमध्ये एकाच कुटुंबातील लोकांचा समावेश
जिल्हाधिकारी पवन गंगवार यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी सात जण मिर्झापूर जिल्ह्यातील होते, तीन जण मध्य प्रदेशातील तर एक व्यक्ती सोनभद्र जिल्ह्यातील होती. मिर्झापूरच्या शिवा सिंग, सोनम सिंग, पियुष सिंग, पंकज सिंग, वंदना सिंग, विष्णू सिंग आणि वीणा सिंग यांचा समावेश आहे. तर मध्य प्रदेशातील सतना येथील कार्तिकेय सिंग आणि प्रियांका सिंग, सागर येथील विकास शर्मा आणि सोनभद्र येथील जय प्रकाश यांचा समावेश आहे.









